नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला हा फर्लो मंजूर केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला आहे.
फर्लो मिळावी म्हणून ३० नोव्हेंबर २०१९ला तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु सात महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याच्या अर्जावर सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले होते. अरुण गवळी हा यापूर्वी पॅरोल किंवा फर्लोवर कारागृहातून बाहेर आला. परंतु दिलेल्या मुदतीत त्याने कुठल्याही नियमांचा भंग केला नाही आणि दिलेल्या कालावधीत तो तुरुंगात हजर झाल्याचा युक्तिवाद गवळीच्या वकिलांनी केला.
गवळीच्या वकिलांचा हाच युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने गवळीला २८ दिवसांची फरलो रजा मंजूर केली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पॅरोल रजा पूर्ण करून तुरुंगात परतलेल्या गवळी ला आता फर्लो रजेची संधी मिळाली आहे. गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणात शिक्षा झाली आहे.