कोल्हापूर : Heavy rains in Kolhapur : जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आज पहाटे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. इतर नद्या देखील दुथडी भरुन वाहत आहेत. गेल्या 48 तासांत पंचगंगेची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे पुराचा मोठा धोका आहे.
सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 30 फूट इतकी झाली असून या नदीवरील 23 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झालेली वाढ सर्वांनाच धडकी भरवणारी आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या दोन तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात पोहचल्या आहेत. त्यातील एक तुकडी शिरोळ तर दुसरी तुकडी ही कोल्हापूर शहरात सज्ज ठेवण्यात आली आहे.
कोल्हापुरात जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात ते महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पूर्व राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे कोकणसह कोल्हापूर आणि सातारा या भागात अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे, तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात त्यातुलनेत सध्या पाऊस कमी प्रमाणात आहे.