शशिकांत पाटील / लातूर : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात काल सायंकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे घरणी नदीला पूर आला. या पुराचे पाणी शिरूर अनंतपाळ ते लक्कड जवळगा या मार्गावर आले आहे. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या पुलावरून तरुण दुचाकीसह वाहून गेला. मात्र सुदैवाने एका झाडाच्या फांदीला धरून त्याने या झाडाचा आसरा घेतला. झाडाला लटकून दोन तास मृत्यूशी झुंज देत होता. त्याला वाचविण्यात यश आले आहे.
ज्ञानेश्वर सूर्यवंशी हा दुचाकीवर गॅस सिलिंडरची टाकी घेऊन आपल्या गावाकडे निघाला होता. मात्र रात्रीच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने ज्ञानेश्वरचा तोल गेला आणि तो दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. मात्र सुदैवाने एका झाडाच्या फांदीला धरून ज्ञानेश्वर यांनी झाडाचा आसरा घेतला. जिवाच्या आकांताने या तरुणाने प्रचंड आरडाओरड केली. त्यानंतर काही वेळाने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्या तरुणाचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती शिरूर अनंतपाळ पोलिसांना दिली. त्यानुसार जमादार सतीश सारोळे यांनी स्थानिक जलतरणपटू पिंटू मांदळे यांना बोलाविले. त्यानंतर एका दोरीच्या साहाय्याने तब्बल दोन तास झाडावर अडकून पडलेल्या त्या तरुणाचा जीव वाचविण्यात सर्वाना यश आले.
ज्ञानेश्वरने जलतरणपटू पिंटू मांदळे, शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यातील जमादार सतीश सारोळे, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. पाण्यातून सुटका झाल्यानंतर ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मी गावाकडे निघालो होतो. पुलावर पाणी आल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलो. एका झाडाच्या फांदीला पकडले. पण ती तुटून जावू लागल्यामुळे मी दुसऱ्या झाडाचा आधार घेतला. त्यावेळी तिथून एक जण गाडी घेऊन जात होता. मी आरडाओरड केली. त्यावेळी त्यांनी घाबरून जाऊ नको म्हणून सांगितले. अर्ध्या तासानंतर पोलीस आले. पिंटू मांदळे यांनी मला वाचवलं. त्यांचे आभार.