नालासोपारा,वसई-विरारला पावसाने झोडपलं

मुसळधार पावसानं झोडपून काढलं

Updated: Jul 10, 2018, 03:42 PM IST
नालासोपारा,वसई-विरारला पावसाने झोडपलं title=

मुंबई : मुसळधार पावसानं आज सलग चौथ्या दिवशी झोडपून काढलं आहे. वसई-विरार-नालासोपारा भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यानं आता वसई आणि विरारमध्ये वीज पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कही बंद पडल्याची माहिती मिळते आहे. रात्रभर झालेल्या पावसानं बोरीवली-विरार दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प आहे. पण बोरीवली ते चर्चगेट लोकल वाहतूक सुमारे २० मिनिटं उशीरानं सुरु आहे. सकाळपासून अनेक भागात पाणी साचल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. मिठागराच्या वस्तीत अजूनहीं पाणी साचले आहे.

वसईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे एका गर्भवती महिलेला आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्थलातरीत केलं आहे. आशा डिसुजा असं या महिलेच नाव आहे. वसईच्या १०० फूट रोड वरच्या मथूरा इमारतीत ही महिला राहत होती. वसईत वाढता पाऊस आणि साचलेलं पाणी यामुळे तिला काहीं वेळापूर्वी घरातून हलवण्यात आलं. वसई अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साह्याने महिलेला बाहेर काढलं. महिलेला अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं आहे. कुठल्याही वेळी तीची प्रसुती होवू शकते त्यामुळं खबरदारी म्हणून तिला हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती ठीक आहें.