मनमाडसह नांदगांव तालुक्यात दमदार पाऊस

 पावसाने गुंगारा भरल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. 

Updated: Jun 27, 2019, 07:47 AM IST
मनमाडसह नांदगांव तालुक्यात दमदार पाऊस  title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळी मनमाड शहरासह नांदगांव तालुक्यातील अनेक गावांना  मुसळदार  पावसाने झोपून काढले. मृगाच्या सुरवातीलाच 7 जूनला पावसाने मनमाड परिसरात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या मशागती लागला होता. मात्र तेव्हापासुन पावसाने गुंगारा भरल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. शेतकरी  पावसाकडे डोळे लावून बसला होता. दररोज प्रचंड उकाडा आणि आकाशात ढगांची गर्दी होत होती. मात्र पाऊस दररोज हुलकावणी देत होता.

बुधवारी सायंकाळीच्या सुमारास पावसाने मनमाड शहरास नांदगांव तालुक्यात जोरदार हजेरी लावली. शांत आणि मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे अनेक गावातील नद्या-नाले दुथडी भरू वाहू लागले. शेतात तसेच सकल भागात पाणी साचले होते. पावसामुळे खरीपाच्या मशागतीला वेग येणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाने नांदगांव तालुक्यातील बराच भाग व्यापला असला तरी तालुक्यातील घाटमाथा परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या मनमाडकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.