नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात सतत ४८ तासांपासून पावसाची जोरदार संततधार पाऊस सुरु आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नरखेड तालुक्यात काल दमदार पाऊस झाल्यानंतर अनेक छोट्या नद्या आणि नाल्यांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण झाली. जलालखेडा - वरुड मार्गावर भरसिंगी जवळ जाम नदीला पूर आले. त्यामुळे सकाळी काही काळ वाहतूक थांबली होती. काल नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काटोल तालुक्यात ही दमदार पाऊस झाला.
Maharashtra: Bhamragad area of Gadchiroli District flooded following heavy & incessant rainfall pic.twitter.com/5DCnVABYL7
— ANI (@ANI) August 8, 2019
मात्र दुष्काळ जाहीर झालेल्या कळमेश्वर तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने पिकं आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि कळमेश्वर या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. काल पासून नरखेड आणि काटोल तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे मात्र कळमेश्वर तालुक्यात पावसाने दडी मारली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सतत ४८ तासांपासून पावसाची जबरदस्त संततधार सुरू असल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. काल रात्री अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शंभरहून अधिक घरं तर चाळीसहून अधिक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. पाण्याच्या पातळीत सध्याही वाढ होत असून भामरागड शहर चारही बाजूने पाण्यानी वेढले आहे.
प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याच काम रात्रीपासून सुरू केलं आहे. आलापल्ली- भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याची पातळी वाढल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला आहे. दरम्यान आजही पावसाचा इशारा देण्यात आला असून भामरागड यात सर्वाधिक प्रभावित राहण्याची शक्यता आहे.