कोल्हापूर : राज्यातल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक मदत म्हणून १० हजार रुपये प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला सरकार देणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशुख यांनी ही माहिती दिली. तर वीज मीटर पाण्याखाली गेलेल्यांना मोफत नवे वीज मीटर दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पुराचं पाणी ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला जाणार असल्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून पुराचा वेढा पडलेल्या कोल्हापूरला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. त्यांनी महावीर कॉलेज परिसरात पूरस्थितीची पाहणी सुरू केली आहे. मात्र या दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना आधीच पाठवायला हवे होते, असे ते म्हणालेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
कोल्हापुरात गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. तीन दिवसांनंतर यंत्रणेच्या मार्फत या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू झालंय. एनडीआरएफकडून या ठिकाणी आधीच बचावकार्य सुरू असलं तरी नौदल आणि लष्कराच्या पथकाद्वारे गावागावात मदत आणि बचावकार्य राबवण्यात येतंय. बचावपथकाने हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. पुणे बंगळुरु महामार्ग जलमय झाला असून या ठिकाणी ४ फूट इतकं पाणी जमा झाले आहे. त्यामुळे कराड ते कोल्हापूर ही वाहतूक ठप्प झालीय. पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भागाचा दौरा करणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन या ठिकाणी तळ ठोकून आहेत. या दोघांसोबत मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
दरम्यान, चार दिवसांनंतरही कोल्हापूर, सांगली येथील पुराची स्थिती कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीची पाहाणी करणार आहेत. तर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पुराचा कहर असल्याने पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे. त्यामुळे हा मार्ग बंदच आहे. तसेच कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटांवर पोहोचल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीत महापुराची परिस्थिती कायम असून, आयुर्विन पुलाजवळ कृष्णानदीची पाणीपातळी सकाळी ५६ फूट ८ इंच इतकी आहे. सांगलीतील अनेक उपनगरामध्ये अद्यापी पाणी शिरलेले आहे. कालपासून सुरू असलेले बचावकार्य आज देखील सुरू राहणार आहे. एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि दोन कोस्ट गार्डच्या टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लोकांच्या बचाव कार्यासाठी गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात ७० हजार लोक आणि २१ हजार जनावर स्थलांतरित झाले आहेत.