थोडे अवघडच होते, पण चंद्रकांत पाटील हसले बरे का?

 महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आपण कधी खळखळून हसताना पाहिलंय का ? 

Updated: Oct 12, 2019, 07:35 PM IST
थोडे अवघडच होते, पण चंद्रकांत पाटील हसले बरे का? title=

अरुण म्हात्रे, पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आपण कधी खळखळून हसताना पाहिलंय का ? निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं तो योग काही प्रमाणात जुळून आला. पुण्यातील चैतन्य हास्य परिवारात प्रचारासाठी गेले असताना चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावरही हास्याच्या नानाविध छटा उमटल्या. थोडं अवघडच होतं , पण प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. हास्य क्लब मध्ये हास्याचे फवारे उडत असताना चंद्रकांत पाटीलही हातचं राखून का होईना हसतमुख झाले.

चंद्रकांत पाटील कोथरुडमधून निवडणूक लढत आहेत. शिवाय राज्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे डोक्यावरचं टेन्शन काहीसे हलके करावसे वाटणे यात काही गैर नाही.  त्याजोडीला पुणेकरांमध्ये प्रचाराची संधीही साधली गेली. याला म्हणतात राजकीय शाहनपण. नाहीतर आपण बघा, कशाचा कशाशी मेळ नसतो, असो. आज दादांचा दिवस आहे. तर दादा सकाळी सकाळी हास्यक्लबमध्ये पोहोचले. सभागृहात प्रवेश करत असतानाच त्यांचं खास हास्यक्लब स्टाईलनं स्वागत झालं.

चंद्रकांत पाटील यांनी वातावरण बघून अक्षरशः हरखून गेले आणि अगदी मनापासून हसले. त्यांचा चेहराच बघाना, क्या बात है ! कॅमेऱ्यात टिपून ठेवावा असा हा क्षण. आगत स्वागत झाल्यानंतर हास्याची प्रात्यक्षिकं सुरु झाली. यावेळी संपूर्ण सभागृहात हास्याच्या लाटा उधळत असताना दादांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य होते. दादांना बहुदा संघशिस्तीची आठवण झाली असावी. त्यामुळे सारंकाही मर्यादा राखूनच. 

या अनोख्या प्रचारफेरीत खासदार गिरीश बापट यांच्यासह स्थानिक नेते मंडळीही तितक्याच उत्साहानं सहभागी झाली होती. त्यांनीही मौकेपे चौका साधत या संधीचा लाभ घेतला. इथे विद्यमान आमदार तसेच कोथरूडमधील भाजपच्या त्यागमूर्ती मेधाताई असायला हव्या होत्या असं आवर्जून वाटून गेले. तिसऱ्यांदा असो. बापटांना हसण्याची अजिबात अॅलर्जी नाही, याचा अनुभव पुणेकरांना आहेच. त्याची प्रचिती आजही आली. जात जाता उपस्थितांनी दादांना हास्याच्या गजरात शुभेच्छा दिल्या.