शिवसेनेचा वचननामा हा बनावटनामा - विजय वडेट्टिवार

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांची टीका

Updated: Oct 12, 2019, 02:25 PM IST
शिवसेनेचा वचननामा हा बनावटनामा - विजय वडेट्टिवार title=

मुंबई : शिवसेनेचा वचननामा हा बनावटनामा असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा करणार, तर मग पाच वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल ही त्यांनी शिवसेनेला केला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. वचननाम्यात अपेक्षेनुसार आश्वासनांची खैरात असल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकरी, गरीब, विद्यार्थी, महिला आणि ग्रामीण भागांवर घोषणांचा पाऊस पाडला आहे. गरिबांसाठी १० रूपयांत स्वस्त जेवणासह १ रुपयात आरोग्य चाचणीचंही आश्वासन देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह खतांचे दरही पाच वर्ष स्थिर ठेवण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं आहे. तसंच हा शिवसेनेचा वचननामा असला तरी युती असल्यामुळे याबाबत मुख्यमत्र्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाला आहे. ७ ऑक्टोबरला आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर भाजपचं संकल्पपत्र १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मतदारांना खूश करण्यासाठी १० रुपयांमध्ये थाळी देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र अटल आहार योजना व्यापक करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बांधकाम कामगारांसाठी ही योजना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. भाजप आता त्याची व्याप्ती राज्यभर वाढवणार आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे.