आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ

आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ झाल्यात. विठुनामाचा गजर करीत लाखो वैष्णवांसह संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले. 

Updated: Jun 18, 2017, 11:07 AM IST
आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ  title=

प्रशांत अनासपुरे / पुणे : आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ झाल्यात. विठुनामाचा गजर करीत लाखो वैष्णवांसह संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले.  

निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात लाखो भाविकांनी दर्शन घेऊन पालखीचे स्वागत केले. सर्वत्र टाळ-मृदंगाचा स्वर निनादत होता. तर, हरिनामाने वातावरण प्रफुल्लित होऊन भक्तीचा रंग सर्वत्र पसरला होता. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सर्व दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी देखील वारीकरिता खास उपस्थित होते. भक्ती-शक्ती चौकात पालखीचा रथ येताच  तुकाराम महाराज नावाच्या जयघोषात भाविकांनी  दिल्यात. नगरसेवक, महापौर आदींनी फुगड्या घालून वारकऱ्यांसह पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.

देहूच्या इनामदार वाड्यातून पालखीने प्रस्थान ठेवले. त्यानंतर अनगडबाबा दर्गा येथे दुपारी आरती झाल्यानंतर देहूरोड येथे पालखी पुणे-मुंबई महामार्गावर आली. संध्याकाळी निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात भव्य स्वागत झाल्यानंतर पालखी आकुर्डी दत्तवाडी विठ्ठल मंदिराच्या दिशेने रवाना झाली. 

वारकऱ्यांच्या भगव्या पतका आणि टाळ-मृदुंगाच्या गजराने उद्योगनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी सेवा पुरविण्यात येत होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.