Gondia Crime : ट्रॅक्टरचा वाद निमित्त ठरला अन्... बापाची हत्या करुन मुलाने काढला पळ

Gondia Crime :  गोदिंयात घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. बापाची हत्या केल्यानंतर निर्दयी मुलाने तिथून पळ काढला आहे. तिरोडी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलाचा शोध सुरु केला आहे

Updated: Mar 26, 2023, 10:03 AM IST
Gondia Crime : ट्रॅक्टरचा वाद निमित्त ठरला अन्... बापाची हत्या करुन मुलाने काढला पळ title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : ट्रॅक्टरच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात घडला आहे. बापाची हत्या केल्यानंतर मुलाने पळ काढला आहे. दवनीवाडा पोलीस (Gondia Police) आरोपी मुलाचा शोध घेत आहेत. मुलानेच बापाची हत्या केल्याने गोंदिया (Gondia Crime) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  गोंदिया पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला आहे. 

भैय्यालाल नागदेवे (55) असे मृत व्यक्तीचे नाव असून ती तिरोडा तालुक्यातील बोधा येथे राहत होती. मृत भैय्यालाल नागदेवे यांनी दोन विवाह केले होते. पहिल्या पत्नीसह भैय्यालाल नागदेवे हे गावातील बौद्ध विहारात राहत होते. नागदेवे यांचा लहान मुलगा लंकेश नागदेवे हा दुसऱ्या गावात राहत होता. नागदेवे यांच्या मुलाचा वडिलांसोबत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन सातत्याने वाद होत होते. शनिवारी झालेल्या शुल्लक वादातून लंकेशने भैय्यालाल नागदेवे यांची हत्या केली आणि पळ काढला.

शेतीच्या कामासाठी लंकेशने भैय्यालाल यांचाकडून ट्रॅक्टर आणला होता. त्यानंतर भैय्यालाल हे ट्रॅक्टर परत नेण्यासाठी आले लंकेशकडे आले होते. त्यावेळी पुन्हा लंकेश आणि भैय्यालाल यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात लंकेशने भैय्यालाल यांना काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत भैय्यालाल यांच्या डोक्याला जबर मार लागला. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्याचे पाहून लंकेशने तिथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. पोलिसांनी मृत भैय्यालाल यांचा मृतदेह  उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदना करता पाठवून दिला. त्यानंतर भैय्यालाल यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन दवनीवाडा पोलिसांनी आरोपी लंकेश भैय्यालाल नागदेवे विरोधात भादवी कलम 302 , 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दवनीवाडा पोलीस सध्या आरोपी लंकेशचा शोध घेत आहेत.

गोंदियात झाडाला लटकवलेला मृतदेह

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोंदियात झाडाला लटकवलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला आहे. हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वनविभागाच्या मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृताच्या मानेवर जखमेच्या खुणा आढळून आल्याचे म्हटले जात होते. संदीप भाऊलाल चिखलोंडे असे मृत  तरुणाचे नाव असल्याचे समोर आले होते. रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालय हिवरा येथील वनविभागाच्या मोकळ्या जागेत दुध घेऊन जाणाऱ्या लोकांना संदीप चिखलोंडे यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता