'जोडीदार मिळत नाही, इच्छामरणाची परवानगी द्या'; पुण्याच्या तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली

Updated: May 12, 2019, 09:57 PM IST
'जोडीदार मिळत नाही, इच्छामरणाची परवानगी द्या'; पुण्याच्या तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र title=

नितीन पाटणकर, झी २४ तास, पुणे : आई-वडीलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी या तरुणाने केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची दखल घेत या तरुणाचे मन वळवण्याचे पोलिसांना आदेश दिले आणि पुणे पोलिसांनाही या नैराश्यात सापडलेल्या तरुणाचे मन वळण्यात यश आलं.

पुण्यातल्या दत्तवाडी परिसरातला हा तरुण आहे. ३२ वर्षांच्या या तरुणाला चांगली नोकरी आहे. स्वतःचं घर आहे. मात्र या तरुणाच्या आजारी आई-वडिलांची सेवा करण्यासाठी कोणतीही तरूणी तयार होत नाही. आई-वडिल आजारी असल्यानं अनेक मुलींनी त्याला नकार कळवलाय. सततच्या नकारामुळे निराश झालेल्या तरूणाने मुख्य़मंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली.

मुख्यमंत्री कार्यालयानं या तरूणाच्या पत्राची दखल घेत दत्तवाडी पोलिसांना या तरूणाचं समुपदेशन करण्याचे आदेश दिले. दत्तवाडी पोलिसांनी या तरूणाची भेट घेतली. त्याचं समुपदेशनही केलं. नवरा हवा पण त्याच्या आईृ-वडिलांची जबाबदारी नाकारणारी मानसिकता समाजात वाढत असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय.