डीपीला फोटो का लावला नाही म्हणून धमकावलं, तरुणीने जीवनच संपवलं

डीपीला फोटो लावायला जबरदस्ती केल्याने महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या  

Updated: Apr 29, 2022, 03:06 PM IST
डीपीला फोटो का लावला नाही म्हणून धमकावलं, तरुणीने जीवनच संपवलं title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजरा तालुक्यातील पोळगाव इथं राहणाऱ्या सविता खामकर या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?
अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव किशोर सुरंगे असं असून त्याचं आणि मृत सविताचे प्रेमसंबंध होते. या दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरु होती. सविताच्या वडिलांनी तिला अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करुन देण्याचं किशोरला सांगितलं.

दरम्यान, किशोरने आपला फोटो व्हॉट्सअॅप डिपीला ठेव असा आग्रह सविताकडे धरला. माझा फोटो डीपीला ठेव नाही तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं किशोरने सविताला सांगितलं. पण तिने याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या किशोरने तिला त्रास द्यायला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वी याच गोष्टीवरुन किशोरने सविताला आजरा इथल्या बसस्थानकावर मारहाण देखली केली होती. त्यामुळे किशोरच्या सततच्या त्रासाला कंटाळून सविताने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. 

या घटनेने गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनी आरोपी किशोरला अटक केली आहे