मुलांना फुगे विकत घेऊन देतांना सावधान... स्फोटात चिमुकलीने गमावला जीव

यात्रेत मोठ्या आनंदाने चिमुकली फुगा घ्यायला गेली, पण... ह्रदयद्रावक घटना 

Updated: Aug 28, 2022, 06:51 PM IST
मुलांना फुगे विकत घेऊन देतांना सावधान... स्फोटात चिमुकलीने गमावला जीव title=
प्रतिकात्मक फोटो

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या शिंदी बुद्रुक इथं बैल पोळ्यानिमित्ताने यात्रा होती. या यात्रेत एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. गॅसचे फुगे (Balloon) विकणाऱ्याकडील गॅस सिलेंडरचा (gas cylinder) स्फोट झाल्याने दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नेमकी घटना काय?
दोन वर्षांची भार्गवी उर्फ परी सागर रोही ही आपले आजोबा रवींद्र किसनराव रोही यांच्यासोबत शनिवारी संध्याकाळी गावातीलच यात्रेत गेली होती. उडणारा फुगा बघून भार्गवीने आपल्या आजोबांकडे फुगा घेण्याचा हट्ट धरला. परीला घेऊन आजोबा फुगे विक्रेत्याजवळ पोहोचले. फुगा विक्रेता फुग्यात गॅस भरत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोट इतका भीषण होता की भार्गवी जागीच कोसळली.

गंभीर जखमी झालेल्या भार्गवीला तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी सांगितलं. गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर काही काळ यात्रेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाने यात्रेत खळबळ उडाली नागरिक सैरावैरा पळू लागले. नजीकच्या एका घराच्या स्लॅबला या स्फोटाने तडे गेल्याची माहिती आहे.