विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा करत रात्रीत गाशा गुंडाळणाऱ्या बीडमधल्या मातोश्री महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यात दीड कोटी हून अधिक ठेविचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेविदारांनी केला आहे.
बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स इथं मातोश्री महिला नागरी पतसंस्थेची शाखा आहे . तब्बल 14.50 टक्के व्याजाचं आमिष दाखवून या पतसंस्थेनं अनेक ठेवीदारांकडून ठेवी गोळा केल्या आणि अचानक पतसंस्थेला टाळे लावुन फरार झाले. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक व सहनिबंधक यांच्याकडे तक्रार केली. त्यांनतर पतसंस्था अध्यक्ष, संचालक आणि लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
ठेवीदार विद्याधर वैद्य यांच्या फिर्यादीवरून चेअरमन योगेश विलास स्वामी, लिपिक जयश्री दत्तात्रय मस्के व इतर संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा घोटाळा दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.