पुणे : Coronavirus in Pune : शहरातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन पोलीस उपायुक्त तर अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. (Four senior police officers infected with corona in Pune) दरम्यान, पुण्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुण्यातील शाळा एक आठवडा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
DCP प्रियांका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड आणि अतिरिक्त पोलीस रामनाथ पोकळे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे यांच्याकडील कारभार तुर्तास अन्य पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तां यांनी काढला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, धोका कमी आहे. राज्यातील अनेक राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. ( Police Corona Update)
मुंबई पोलीस दलातील एकूण 18 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता पुण्यातही पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना झाला आहे. मुंबईत पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तांसोबत चार अप्पर पोलीस आयुक्त आणि 13 पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे.