कोकणात जोरदार पावसाचा तडाखा, चिपळुणात डोंगराला भेगा तर घरांवर दरड कोसळून चार जण जखमी

Maharashtra Rain: Maharashtra Heavy rain - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदीवसे येथील डोंगराला भेगा पडल्या आहेत.तर वसईत मोठी दरड घरावर आली आहे. यात चार जण जखमी झालेत.

Updated: Jul 13, 2022, 09:26 AM IST
कोकणात जोरदार पावसाचा तडाखा, चिपळुणात डोंगराला भेगा तर घरांवर दरड कोसळून चार जण जखमी title=
वसई येथे घरांवर मोठी दरड कोसळली आहे. (प्रतिनिधी - प्रथमेश तावडे)

मुंबई / रत्नागिरी / वसई : Maharashtra Rain: Maharashtra Heavy rain - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदीवसे येथील डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे डोंगर खचण्याचा मोठा धोका असून नागरीवस्तीला धोका निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी गावकऱ्यांची वस्ती आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण पसरले आहे.

कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका या डोंगराला बसला आहे. नांदीवसे येथील वस्तीतील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेत. याआधी चिपळूण येथे तिवरे धरण फुटले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेकांची घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. पुन्हा एकदा पावसाचे संकट निर्माण झाले आहे.

वसईत घरांवर दरड कोसळली

दरम्यान, मुंबई जवळील वसईत घरांवर दरड कोसळली असून चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच दरड कोसळल्याने अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक घरांचं नुकसान झाले आहे. दोघांची सुटका करण्यात यश आले आहे. पावसामुळे वसईत घरांवर दरड कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे.

महामार्गावर वाघोबा खिंडीत दरड कोसळली 

पालघर जिल्हात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वाघोबा खिंडीत दरड कोसळली आहे. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ट्रॅफिक जाम झाले आहे. तर नांदगाव येथे पाणी भरल्याने काही वेळी वाहतूक ठप्प झाली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

उरण परिसरात घर कोसळून एकाचा मृत्यू

नवी मुंबई जवळील उरण परिसरात घर कोसळून एकाचा मृत्यू झालाय. उरणमधील जांभूळपाडा, कातकरी वाडीत अतिवृष्टीमूळे घर कोसळलं या दुर्घटनेत राम कातकरी यांचा मृत्यू झालाय. तर त्यांच्या पत्नीला  किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी तहसीलदार आणि त्यांची टीम पोहचून मदतकार्य सुरु केले आहे.

कोकण भागात मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain in Konkan region : ओडिशावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच चक्रीवादळामुळे येत्या चार ते पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. आयएमडीने म्हटले आहे की, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील घाट भागात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. ओडिशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच चक्रीवादळ पसरल्याने पावसाची शक्यता अधिक आहे.