रायगड : अखेर अलिबाग तालुक्यात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले. आज अलिबाग मुरूडमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज अलिबागच्या काँग्रेस भुवन येथे पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सुनील तटकरे आणि अलिबागचे काँग्रेस नेते मधुकर ठाकूर यांच्यातून विस्तव जात नाही, अशी स्थिती असताना दोन दिवसांपूर्वी तटकरे यांनी ठाकूरांची भेट घेतली होती. त्यानंतर ही दिलजमाई झाली आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी केवळ आम्ही तटकरे यांना पठिंबा देत असल्याचे मधुकर ठाकूर यांनी आज स्पष्ट केले.
अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष योगेश मगार, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनंत गोंधळी, रायगड जिल्हा महिला काँगेस अध्यक्ष अॅड. श्रध्दा ठाकूर, मुरूड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदस्य इस्माईल घोले यावेळी उपस्थित होते. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी काँगेस आणि मित्रपक्षांची एक - एक जागा निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करा असे आदेश पक्षश्रेष्ठीनी दिले आहेत. त्यामुळे आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. नाईलाज म्हणून आम्ही तटकरेंना पाठिंबा देत आहोत. निवडून आल्यानंतर तटकरेंनी बेइमानी केली तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही, असे मधूकर ठाकूर यांनी स्पष्ट केले. आपल्या घरी कुणीही आले तरी त्याचा अपमान करायचा नाही, हे आमचे तत्व आहे, असे यावेळी ते म्हणालेत.
गतवर्षी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात मधुकर ठाकूर यांनी तटकरेंचा राजकीय बदला घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी आदिती तटकरे या देखील तिथे उपस्थित होत्या. राज्यात जरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी झाली तरी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात अशी आघाडी होणार नाही. सुनील तटकरे यांनी सलग तीन वेळा आमची फसवणूक केली आहे. याचा राजकीय बदला घेतल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे विधान ठाकूर यांनी घेतले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा जड जाणार अशी शक्यता होती. मात्र, मन वळविण्यात यश आल्याने येथील समीकरण बदलण्याची शक्यता आहे.