विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : उद्घाटनापासून चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता समृद्धी महामार्गवर फोटो-रील्स काढल्यास 500 रुपयांचा दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून रील्स आणि फोटो काढणं प्रवाशांना आता महागात पडणार आहे. वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
समृद्धी महामार्गावर काही तरुण फोटो, रील्स काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचं आढळून येत असल्याने राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारे महामार्गावर फोटो किंवा रील्स तयार करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईचे संकेत वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून अनेक तरुण तरुणी फोटो आणि रील्स काढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढण्यासाठी आता मनाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना 500 रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.
समृद्धी महामार्गावर सहा महिन्यातच खड्डे
मुंबई ते नागपूर असा 701 किमीचा समृद्धी महामार्ग एमएसआरडीसीकडून बांधण्यात आला आहे. मात्र हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर अवघ्या सहा महिन्यांमध्ये खड्डे पडल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. सहा महिन्यातच समृद्धी महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने अपघाताची शक्यता आणखी वाढली आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून आणि जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. मात्र आता रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने अपघातांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.