'जुने निष्ठावंत सोडून जातात याचं...'; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Uddhav Thackeray In Shivsena Meeting: मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसमोर उद्धव ठाकरेंनी भाषण देताना आपल्या भावना व्यक्त केला. यावेळेस त्यांनी सोडून गेलेल्या सहकाऱ्यांसंदर्भातही विधान केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 24, 2023, 02:37 PM IST
'जुने निष्ठावंत सोडून जातात याचं...'; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत title=
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं विधान

Uddhav Thackeray In Shivsena Meeting: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोरी करणाऱ्यासंदर्भात भावनिक विधान केलं आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये 'सोडून गेलेले सहकारी' अशा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी हे विधान केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबईमधील या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा दरारा आणि स्वाभिमान जपण्यासाठी पुन्हा पॅचअप केलं नाही असंही स्पष्ट केलं. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दिर्घ न्यायालयीन संघर्ष दोन्ही गटांमध्ये झाला. सध्या राज्यात दोन्ही गट सक्रीय आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी सहकारी सोडून गेल्याबद्दल खंत व्यक्त केली. 'जुने निष्ठावंत सोडून जातात याचं वाईट वाटतं. तुमच्यापैकीही कुणाला जायचं असेल तर खुशाल जाऊ शकता. संकटं येतात आणि जातात. मी मात्र खंबीर आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 2022 साली जून महिन्यामध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकींनंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळेच अल्पमतात गेलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. 'मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना मला डांबून ठेवता आलं असतं. पण मनाने फुटलेत त्यांना डांबून काय कराणार? मी त्यांना काय कमी केलेलं?' असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोरच्या भाषणात म्हटलं. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतरच्या न्यायालयीन लढाईनंतर शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सध्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही गट शिवसेना हेच नाव वापरतात. दोन्ही गटांची चिन्हं मात्र वेगवेगळी आहेत.

पुन्हा सत्तेत येणार

पदाधिकाऱ्यासमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी, "आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत," असंही म्हटलं. तसेच, "माझा काहीही स्वार्थ नसून मला निवडणूक लढायची नाही,' असंही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आमदार म्हणून विधानपरिषदेवर गेले. 

...म्हणून भाजपाबरोबर तडजोड केली नाही

आपण भाजपाबरोबर मुद्दाम पॅचअप केलं नाही असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. 'मी भाजपाबरोबर पॅचअप करु शकलो असतो पण माझ्या नितीमत्तेत ते बसत नव्हतं. 2014 पासून ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांच्याबरोबर कसं जाणार?' असा सवाल उद्धव यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विचारला. 'मला स्वाभिमान महत्त्वाचा होता. शिवसेनेचे दरारा कायम राखणं महत्त्वाचं होतं. म्हणूनच मी तडजोड केली नाही,' असंही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.