नितेश महाजन, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हायवा ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वारांना चिरडलं. या अपघातात परीक्षेला जाणारे तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले. तिन्ही भाऊ बहिणीच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. हा भीषण अपघात बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला.मृत तिघेही बहीण-भाऊ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी आहेत.
प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. तिघेही वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. त्यांच्याजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
वनविभागाची परीक्षा देऊन अंभोरे भावंडे राहत्या रूमकडे निघाले होते. मात्र भरधाव असलेल्या हायवाने तिन्ही भावंडांच्या बाईकला चिरडले. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. बीड बायपासवरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर गुरुवारी सकाळी 9.45 च्या सुमारास ही घटना घडली.
सकाळीच वनविभागाच्या परीक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते. झाल्टा फाट्याकडून तिघेही बहिण भाऊ बाळापूर परिसरातून सातारा-देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते. त्याचवेळी बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक ओव्हरटेक करत सुसाट जात होता. पुढे गेल्यावर तो अंभोरे भावंडांच्या बाईकला धडकला. त्यांची बाईक रस्त्याच्या एका बाजूने जात असतानाही मागून येऊन हायवाने त्यांना धडक दिली. त्यानंतर हायवा चालक तिथून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना अपघाताच्या ठिकाणी वनविभागाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र सापडले. प्रवेशपत्रावरून पोलिसांना अंभोरे भावंडांचा पत्ता सापडला. तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.