'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका

 मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका

Updated: Oct 30, 2018, 05:30 PM IST
'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका title=

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या वादाला आता राजकीय वळण लागलंय... विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेवर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, त्यांचा ताफा अडवला. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात संघर्ष यात्रा काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाच मंगळवारी शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. 

औरंगाबाद - जालना रस्त्यावर शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. रस्त्यावर झोपून त्यांनी विखे पाटील हाय हायच्या घोषणा दिल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही शेतकऱ्यांच्या असंतोषाला तोंड द्यावं लागलं... काँग्रेस नेत्यांवरच शेतकरी भडकले होते... कारण मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका...

एकीकडं दुष्काळावरून सरकारवर टीकेची झोड उठवायची... त्यासाठी मराठवाड्यात संघर्ष यात्रा काढायची... तर दुसरीकडं नगर आणि नाशिकमधल्या धरणातून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी सोडायला विरोध करायचा... यामुळं शेतकरी संतापलेत.

त्यात जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, यासाठी विखे पाटलांच्या कारखान्यानं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. जायकवाडीत सोडलेल्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांसाठी नव्हे तर दारू निर्मिती कारखान्यांना होतोय, असा दावा विखे पाटलांनी याचिकेत केलाय. त्यामुळं सरकारनंही पाणी सोडण्याचा निर्णय पुढं ढकललाय. 

समन्यायी पाणी वाटप करण्याचा कायदा आणि मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार जायकवाडी धरणात १७० दशलक्ष घन मीटर पाणी सोडण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या राजवटीत झाला होता. आता तेच काँग्रेसचे नेते दुटप्पी भूमिका घेऊ लागल्यानं मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय.