लातूर : शेतकऱ्यांच्या संपाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. औसा तालुक्यातील चिंचोली काजळे या गावातील शेतकऱ्यांनी शहरात दूध न पाठविता जवळपास ७०० लीटर दूध ग्रामस्थांना वाटले.
हालगी वाजवून दुधाचे वाटप गावातील हनुमान मंदिरापुढे करीत सरकारच्या शेतकरी धोरणाचा निषेध केला. तर रेणापूर तालुक्यातील खलंग्री गावनेही भाजीपाला, दूध शहरात पाठविला नाही. खलंग्री येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत ठराव करून शेतकरी संपाला पाठिंबा दिला.
जर सरकारने शेतकऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष केले तर अशाच पद्धतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान लातूर, औसा आणि निलंगा बाजार समितीतील सौदेही आज बंद होते. लातूर, औसा, निलंगा या कृषी उत्पन्न बाजार समितीतील सौदे या संपामुळे निघालेले नाहीत. त्यामुळे आपल्या धान्याच्या विक्रीसाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांचीही यामुळे अडचण झाली.