सचीन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : महाराष्ट्रात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. याही पुढे जाऊन त्यांना पेटवून देताना या नराधमांना काही कसं वाटत नाही. या घटनांच्या नंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील शेतकऱ्याच्या एका अभियंता मुलीने थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून आपली भीती व्यक्त केली आहे. तसेच अशा नराधमांना हैदराबाद मधील घटनेप्रमाणे ताबडतोब न्याय द्या अन्यथा लवकरात लवकर कठोर शिक्षा द्या.
सत्ता येते सत्ता जाते. सत्ताधारी बदलतात पण माझ्या शेतकरी बापाची परिस्थिती बदलत नाही. शेतकरी बाप व्यवस्थेचा बळी पडला. आता त्याच्या न्यायासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. पण संध्याकाळी मी स्वतःच्या घरी सुखरूप पोहोचेल याची शाश्वती आहे का ? असा प्रश्न पूजा झोळे या अभियंता तरूणीने गृहमंत्र्यांना विचारला आहे.
महिलांवर ,महाविद्यालयातील तरूणींना पाळत ठेवणाऱ्या नराधमांकडून अत्याचाराला बळी पडाव लागत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित महिला, तरूणीला तात्काळ न्याय द्या. हैदराबाद मधील दुर्दैवी घटनेनंतर जसा न्याय झाला तसा तरी न्याय द्या. पूजा झोळे या विद्यार्थीनीने गृहमंत्री यांना साद घातली आहे.
महाराष्ट्र हे तुमचे घर आहे आणि या घरातील महिला, मुली तुमच्या भगिनी आहेत. त्यांच्या अत्याचारात वाढ होत आहे. यापुढे तरी गृहमंत्री यांनी अशा घटनांना आळा बसेल यासाठी कडक कारवाई करावी. राज्याचे रक्षणकर्ते म्हणून मी तुमच्या कडे विनवणी करते. अस पत्र पूजा झोळे या अभियंता विद्यार्थीनीने लिहलं आहे.