Brainvita Game : ब्रेनविटा खेळाचा शोध भारतातच लागला; महाराष्ट्रातील 1100 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात सापडले पुरावे

भारतातील प्राचीन मंदिर अनेक रहस्यांनी भरलेली आहेत. त्यातच आता चंद्रपुरमधील मंदिर पाहून संशोधन हैराण झाले आहेत. 

Updated: Feb 2, 2023, 08:19 PM IST
Brainvita Game : ब्रेनविटा खेळाचा शोध भारतातच लागला; महाराष्ट्रातील 1100 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात सापडले पुरावे title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ब्रेनविटा खेळाच्या (Brainvita Game) भारतीय उगमाचे पुरावे सांगणारे मंदिर सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.  महाराष्ट्रातील चंद्रपुरमधील (chandrapur) 1100 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात (ancient temple) या खेळाचे पुरावे सापडले आहेत. यामुळे  ब्रेनविटा खेळाचा शोध भारतातच लागला असा दावा खरा ठरत आहे. जगातील अनेक देशातील हा लोकप्रिय खेळ आहे. या खेळाच्या स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते. 

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर - नवरगाव रोडवरील नेरी गावात 1100 जुनं प्राचीन महादेव मंदिर आहे. या मंदिराला पाहताच हे मंदिर अनेक शतकं जुने असल्याचे कोणाच्याही लक्षात येईल. जाणकारांच्या मते हे चालुक्य राजांनी स्थापन केलेले मंदिर असून दहाव्या किंवा अकराव्या शतकात या मंदिराचे बांधकाम झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मात्र, हे मंदिर अकराशे वर्षे जुने आहे एवढेच याचे महत्त्व नाही तर, या मंदिरामध्ये भारतातील एका अत्यंत प्राचीन खेळाचे भक्कम पुरावे ही दडलेले आहे. मंदिराच्या दगडांवर अनेक छिद्र असलेली एक आकृती दिसते. हे बुद्धी जाळ आहे. आधुनिक काळात याच खेळाला ब्रेनविटा या नावाने ओळखतात. 

छिद्रामध्ये गारगोटी ठेवून एक गोटी उचलून पुढच्या रिकाम्या छिद्रात ठेवून मागची एक गोटी उचलत हा खेळ खेळला जातो. पुरातत्व शास्त्राच्या तज्ञांप्रमाणे नेरी गावात दहाव्या किंवा अकराव्या शतकात महादेव मंदिराचे बांधकाम होत असतानाच या ठिकाणी जमिनीवर बुद्धी जाळ किंवा ब्रेन वीटाचा हा खेळ कोरण्यात आला असेल. 

जाणकारांच्या मते बुद्धी जाळ हा खेळ प्राचीन काळी फक्त भारतातच खेळला जात नव्हता. तर फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड या पाश्चिमात्य देशांमध्येही या संदर्भातले ऐतिहासिक पुरावे सापडले आहेत. फ्रान्सचा राजा लुई चौदावा याच्या राजदरबारामध्येही हा खेळ खेळला जात असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत. 

बुद्धीजाळ हा खेळ शुद्ध भारतीय खेळ आहे. मध्य भारतात सातपुडा पर्वत शृंखलेत अनेक ठिकाणी रॉक शेल्टर म्हणजेच गुहांमध्ये असेच चित्र किंवा कोरीव काम 4 हजार ते 14 हजार वर्ष जुने आढळतात.त्यामुळे बुद्धी जाळ भारतातूनच पाश्चिमात्य जगात गेला असावा असं जाणकारांचा मत आहे.

नेरीच्या महादेव मंदिरात अनेक ठिकाणी हा ब्रेनविटा खेळ कोरण्यात आला होता. मात्र काळाच्या ओघात आणि मंदिराची डागडुजी करतांना अजाणतेपणी अनेक ठिकाणी हा नष्ट झालाय. दरम्यान नेरी गावातील लोकांना महादेव मंदिरातील या ऐतिहासिक खेळा संदर्भात फारशी माहिती नाही मात्र या मंदिराचे जतन व्हावं ही त्यांची इच्छा आहे. बुध्दीला चालना देणारा म्हणजेच ब्रेन exercise म्हणून ब्रेनविटा हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे. मात्र हा खेळ आपल्याच बुद्धिमान पूर्वजांनी शोधून काढलाय, तो ही शेकडो वर्ष आधी ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.