मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे. यासाठी सर्व पालिका आयुक्तांनी 'ट्रॅक एन्ड ट्रेस'वर जास्तीत जास्त भर देऊन एकेका रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे. मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात अधिक गांभीर्याने रुग्णांचे संपर्क शोधणे तसेच तातडीने त्यांच्यावर निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पुढील उपचार करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जिल्ह्यातील पालिका आयुक्तांची आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, उपयुक्त अश्विनी भिडे उपस्थित होते.
#ठाणे जिल्ह्यातील #Covid_19 साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जिल्ह्यातील पालिका आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली बैठक. पालकमंत्री @mieknathshinde , मुंबई उपनगरचे पालकमंत्री @AUThackeray , मुख्य सचिव अजोय मेहता, संजय कुमार आदी उपस्थित. pic.twitter.com/pRCyDIzadR
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 26, 2020
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावेळी कोरोना साथीच्या बाबतीत करीत असलेल्या प्रयत्नांविषयी तसेच येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात अधिक गांभीर्याने रुग्णांचे संपर्क शोधणे तसेच तातडीने त्यांच्यावर निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पुढील उपचार करणे आवश्यक आहे. बेड्सची उपलब्धता होईल आणि त्याची माहिती गरजू रुग्णास तातडीने मिळेल हे पाहावे.
कोविड केअर केंद्रांची तीन स्तरीय रचना खूप प्रभावी आहे. यामध्ये रुग्णांचे वर्गीकरण त्यांच्या तब्येतीनुसार करून उपचार देण्यात येतात. ही रचना ठाणे जिल्ह्यात व्यवस्थित काम करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय डॉक्टर्स व परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी हे मनुष्यबळ तिथल्या तिथे लगेच कसे उपलब्ध होईल, याबाबतचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.