मुंबई : या निवडणुकीच्या निकालांत सर्वाधिक चर्चा होईल ती पार्थ पवार यांच्या पराभवाची.... पार्थ पवारांचा पराभव ही राष्ट्रवादीतल्या दुफळीची नांदी ठरेल का? पार्थ पवार हरले... यावर प्रतिक्रिया द्यायला शरद पवार आले ते दुसरा नातू रोहित राजेंद्र पवारला बाजूला घेऊन... यातच सगळं आलं... आजोबांनीच रचलेल्या चक्रव्यूहात पार्थ फसले का?
पार्थचा पराभव होणार हे पवारांना माहीत होतं का? बघा आम्ही नाही, असं खुद्द पवारांनी म्हटलं... जनतेचा कौल विनम्रतेनं मान्य करतो अशा शब्दांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचा मावळमधला पराभव स्वीकारला. 'मावळची जागा राष्ट्रवादीनं कधीच जिंकली नव्हती, त्यामुळे ती जिंकण्याच्या विचारानंच पार्थला मैदानात उतरवल्याचं' त्यांनी सांगितलं. शिवाय निकालानंतर ईव्हीएमवर संशय घेणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले. पार्थ पवार यांच्या पराभवानंतर, शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
मात्र, यावेळी त्यांच्या बाजूला बसले होते ते त्यांचे दुसरे नातू रोहित पवार... यावर पुढचं पाऊल टाकलं ते रोहित पवार यांनीच... विधानसभेसाठी तयार आहे, हे सांगायला हाच मुहूर्त त्यांनी साधला.
नातू हरला पण पोरीनं कशीबशी का होईना पण बारामती राखली... पोरगी ती पोरगी आणि चुलता तो चुलता... माझ्या मार्गात जो येईल, तो पराभूत होईल... असे अनेक संदेश पवारांनी दिलेत. पण आता पार्थ पवारांच्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे काय होणार? हा सर्वात मोठा प्रश्न... आता लक्ष आहे ते अजित पवारांकडे...