35 की ...? दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात, बोर्डानं केला खुलासा

Education News : SSC बोर्डाच्या परीक्षेत काठावर पास होण्यासाठी किती गुण गरजेचे? शिक्षण मंडळाची महत्त्वाची माहिती. दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी नक्की वाचा...   

सायली पाटील | Updated: Nov 22, 2024, 08:26 AM IST
35 की ...? दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात, बोर्डानं केला खुलासा  title=
Education news ssc exams 2025 maharashtra state board passing marks limit revised latest update

SSC Board Exams 2025 : चालू वर्ष सरण्यासाठी आता अवघा महिन्याभराचा काळ उरलेल्या असतानाच नव्या वर्षाची चाहूल अनेकांना लागली आहे. नवं वर्ष, नव्या संधी आणि जगण्याच्या नव्या वाटा... याच वाटांचे वाटसरु होऊ पाहणारा एक मोठा विद्यार्थीवर्ग येत्या वर्षात बोर्डाच्या परीक्षेसाठीची तयारी करताना दिसत आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षांची तारीख समोर आलेली असतानाच आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक वेगळाच संभ्रम पाहायला मिळत आहे. 

हा संभ्रम आहे तो म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठीच्या किमान गुणांसंदर्भातला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये इयत्ता दहावीसाठी उत्तीर्णतेचे निकष अर्थात काठावर पास होण्यासाठीच्या गुणांची मर्यादा मागील काही वर्षांपासून चालत आलेल्या प्रचलित नियमांप्रमाणेच असेल असं शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे. थोडक्यात ही मर्यादा 35 गुण आणि त्यापुढे... अशीच असेल. 
 
इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 गुणांची आवश्यकता असते. पण, 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील अभ्यासक्रम आराखड्यातही काही बदलांसाठीचा प्रस्ताव पुढे करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार काठावर उत्तीर्ण होण्यासाठी 20 गुणांपेक्षा जास्त आणि 35 गुणांहून कमी गुण असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन प्रवेशासाठी पात्र असतील असं या प्रस्तावात म्हणत बदल सुचवण्यात आला आहे. 

दरम्यान, सदरील बदल अद्यापही प्रस्तावित असून, कोणतेही बदल झाल्यास वर्षी मंडळाकडून त्यासंदर्भातील माहिती देण्यात येईल असं राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट सांगितलं आहे. राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या शरद गोसावी यांच्या माहितीनुसार राज्य अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आलेली तरतूद तूर्तास प्रस्तावित असून, अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. ज्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांना संभ्रमात पडण्याचं कारण नसून सध्या प्रचलित गुणपद्धतीनुसारच मार्कांचं वितरण केलं जाईल असा खुलासा करण्यात आला आहे. शिक्षण आराखड्यात कोणताही बदल करायचा असल्यास त्यासाठी शासन मान्यता आणि शासन निर्णय अशा प्रक्रिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्यामुळं सध्यातरी असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती? 

कधी आहेत दहावीच्या परीक्षा? 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची (HSC Board Exam) परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीच्या परीक्षा (SSC Board Exam) 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 दरम्यान पार पडणार आहेत.