मुंबई - औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जलआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले होते. मागील आठवड्यात जलआक्रोश आंदोलन करत सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला होता. मागील दोन ते तीन महिन्यापासून औरंगाबादेत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. साधारण तीन ते चार दिवसाने शहरात पाणीपुरवठा होत आहे. या भीषण पाणीटंचाईने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आज मुंबईत मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेचा धारेवर धरले. "मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झालाच पाहिजे" अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळून द्यावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठ्याची 1680 कोटी रुपयांची योजना शासनाच्या वतीने मंजुर करण्यात आली आहे. ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुचवले. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल या योजनेतील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल अशी सोय करा असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारीची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दखल या बैठकीत घेतली. "ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करा" अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीला औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थितीत होते.