पोलीस पत्नीकडे लैंगिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील BJP पदाधिकाऱ्याविरोधात FIR दाखल

Dombivli Molestation Case Against BJP Office Bearer: मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून प्रशासकीय अधिकारी विरुद्ध राजकीय नेता असा संघर्ष पहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 21, 2023, 10:27 AM IST
पोलीस पत्नीकडे लैंगिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील BJP पदाधिकाऱ्याविरोधात FIR दाखल title=
मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणाची डोंबिवलीत चर्चा

Dombivli Molestation Case Against BJP Office Bearer: डोंबिवलीमधील (Dombivli) भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरोधात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक मानपाडा पोलीस स्टेशनमधून बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीमुळे दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे डोंबवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बदलीसाठी भाजपाचं आंदोलन

भाजपाचे पदाधिकारी असलेले नंदू जोशी ही आपल्यावर घर खाली करण्यासाठी दबाव आणत होते असा आरोप या महिलेने केला आहे. तसेच त्यांनी आपल्याकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे. या तक्रारीच्या आधारे एुफआयआर दाखल झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. मानपाडा पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बडगे यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. बडगे यांनी मुद्दाम नंदू जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. बडगे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. भाजपाच्या आंदोलनानंतर बडगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. 

10 दिवसांपासून या महिलेचं आंदोलन

सबंधित पोलीस अधिकाऱ्याची पत्नी म्हणजेच पीडित महिला मागील 10 दिवसांपासून पोलीस स्टेशनबाहेर 10 दिवस आंदोलन करत होती. जोशी यांना अटक करावी अशी या महिलेची मागणी होती. स्थानिक भाजपा पदाधिकारी जोशी यांना पाठीशी घातल असून त्यांना अटक केली जाऊ नये म्हणून पोलीस खात्यावर दाबाव आणत असल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये या प्रकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी विरुद्ध राजकारणी असा संघर्ष दिसून येत असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

प्रकरण करण्यात आलं वर्ग

दरम्यान, मंगळवारी (20 जून 2023 रोजी) ठाणे पोलिसांनी हे प्रकरण मानपाडा पोलीस स्टेशनकडून गुन्हे शाखेकडे वर्ग केलं आहे. ठाणे पोलिसांच्या झोन 3 चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील अनेक आठवड्यांपासून या प्रकरणामुळे कल्याण, डोंबिवलीचं राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. पीडित महिलेने स्थानिक पोलिसांवर भाजपा नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप केल्यानंतर आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने तपासाला वेग मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. डोंबिवलीचे आमदार हे भाजपाचे रविंद्र चव्हाण आहेत. रविंद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. नंदू जोशी यांच्या फेसबुक अकाऊंटवर रविंद्र चव्हाणांबरोबरचे अनेक फोटो आहेत. याच भागातील खासदार हे खुद्द मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत.