दिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी

 दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळीही कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. 

Updated: Oct 22, 2017, 10:05 PM IST
दिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी title=

प्रणव पोळेकर झी मीडिया, रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात हजारोंच्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळीही कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. 

कोकणचं निसर्गसौंदर्य प्रत्येकाला खुणावतं. निळाशार समुद्रकिनारा आणि इथला अद्भूत नजारा पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळेच मुंबई-पुण्यासह दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आणि इतर ठिकाणांहूनही पर्यटक यावर्षी दिवाळीच्या सुट्टीसाठी कोकणात दाखल झाले आहेत. 

रत्नागिरीत वॉटर स्पोर्ट्ससोबतच समुद्रात भिजण्याची मजा सुद्धा पर्यटक लुटत आहेत. सोबतच गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली अशा ठिकाणांना पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. 

रत्नागिरी नजिकच्या गणपतीपुळे मंदिरासमोरचा किनारा पर्यटकांनी तर अक्षरशः फुलून गेलाय. दूरपर्यंत पसरलेले इथले स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना इथं आकर्षित करतात. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एसटी आंदोलनामुळे गर्दी कमी असल्याचं स्थानिक सांगताहेत. 

परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा आता कोकणातही मिळू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागले आहेत.