यवतमाळ : परवानगी नसलेल्या कीटकनाशक विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात कीटकनाशकाने विषबाधित रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणीने २२ शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झाला असून ८०० हून अधिक जणांना विषबाधा झाली. सध्या जिल्हा रुग्णालयात २४ रुग्ण उपचार घेत असून मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली.
'मुख्यमंत्री विदर्भातले असूनही या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करतायत. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही त्यांनी यवतमाळला येणे टाळले' असा आरोप विरोधकांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यवतमाळात भेट देऊन आढावा बैठक घेतली. दरम्यान पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त यवतमाळमध्ये ठेवला.
या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता देखील बाळगण्यात आली.
पोलिसांनी शेतकरी नेत्यांच्या घरापुढेही पहारा ठेवला. केंद्राच्या कीटकनाशक कायद्यात बदल सुचविणार असून कायदा बदलण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसेच कीटकनाशक कंपनी, फवारणी साहित्य पुरवठा करणाऱ्यावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.