राणेंचा दुसऱ्यांदा काडीमोड: कॉंग्रेसने शब्द पाळला नाही : राणे

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस सोडल्याची अधिकृत घोषणा गुरूवारी केली. कुडाळ येथे त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. एकेकाळी शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा हा घेतलेला दुसरा निर्णय. यापूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 21, 2017, 04:21 PM IST
राणेंचा दुसऱ्यांदा काडीमोड: कॉंग्रेसने शब्द पाळला नाही : राणे title=

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडल्याची अधिकृत घोषणा गुरूवारी केली. कुडाळ येथे त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. एकेकाळी शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा हा घेतलेला दुसरा निर्णय. यापूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते.

पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा करताना राणे यांनी पक्षातील पदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. या वेळी राणे यांनी आपल्या आपल्या खास शैलीत कॉंग्रेसवर निशाणा साधला. कॉंग्रेसवर हल्ला चढवताना राणे म्हणाले, मी शिवसेना सोडली तेव्हा तुम्हाला सहा महिन्यात मुख्यमंत्री करू असा शब्द अहमद पटेल यांनी दिला होता. पण, त्यांनी तो शब्द पाळला नाही. आजवर माझ्यासोबत कॉंग्रेस कसे वागले याबाबत मी आज तुम्हाला सांगणार आहे. २६ जुलै २००५ रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मॅडमच्या भेटीत विलासराव देशमुख यांच्याविरूद्ध जे सांगायला सांगितले होते ते मी सांगितले. नंतर अहमद पटेल म्हणाले, थोडे दिवस थांबा. थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही.

पुढे बोलताना राणे म्हणाले, मॅडमनी मला दोनदा शब्द दिला होता तुम्हाला. मुख्यमंत्रीपदाचे अनेकदा आश्वासन देऊनही पद मिळालं नाही. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पण, मला मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने पाळले नाही. माझ्याकडून महसूलमंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो. पण, तेव्हा दिला नाही. आतापर्यंत मला मुख्यमंत्रीपदाने ४ वेळा हुलकावणी दिली, अशा शब्दात नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.