विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकासआघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर

Updated: Mar 8, 2021, 06:54 PM IST
विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद title=

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. उद्या सकाळी विधानभवनात याबाबत काँग्रेसची बैठक आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी ही भूमिका मांडली. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र त्यासाठी अनुकूल नाही. अर्थसंकल्प चर्चा आणि तो मंजूर करून घेणे हे सरकारचे प्राधान्य आहे, त्यामुळे तूर्तास निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी तयार नाही अशी त्यांची भूमिका आहे. तर निवडणूक व्हावी म्हणून काँग्रेस आग्रही आहे.

विधानसभा अध्यक्षपदावरुन महाविकासआघाडीत पुन्हा एकदा मतभेद होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच असणार आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानतंर आता त्यांच्या जागी काँग्रेस कोणाला संधी देते हे पाहावं लागेल. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. 

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसकडे खाती कमी आहेत. आता विधानसभा अध्यक्षपदही रिक्त असल्याने काँग्रेस निवडणुकीसाठी घाई करत आहे. हे पद रिक्त असल्याने विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपद राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे.

कोणाच्या नावाची चर्चा?

नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरु आहेत. या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे आणि के. सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे.

राज्याचं अधिवेशन १० मार्चपर्यंत आहे. त्यामुळे येत्या २ दिवसात काँग्रेसची मागणी मान्य होते का हे पाहावं लागेल. कोरोना रिपोर्ट अजूनही आला नसल्याने आमदारांना उपस्थित राहता येणार नाही. अशा परिस्थितीत जर संख्याबळ कमी पडलं तर सरकारची पंचायत होऊ शकते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावरील चर्चा आणि मंजुर करुन घेण्याचा सरकारचा आता प्रयत्न असेल.

काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आता उद्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी मागणी होत आहे. महाविकासआघाडी आता यावर काय निर्णय घेते हे पाहावं लागेल.