तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.

आकाश नेटके | Updated: Sep 26, 2023, 09:08 AM IST
तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय title=

Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर - सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तीन दिवस तुळजापूर-सोलापूर महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी विभागनिहाय यंत्रणेकडून शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारीचा आढावा घेतला. तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव 6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर रोजी कालावधीत पार पडणार आहे. या काळात देशभरातून आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी असते. या यात्रेसाठी सोलापूरहून भाविक पायी चालत तुळजाभवानी मंदिरात येतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तुळजापूर-सोलापूर मार्गावरील वाहतूक गर्दीमुळे 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. त्यामुळे आता या महामार्गावरुन बुधवार ते शुक्रवारपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

"नवरात्र महोत्सवाची प्रशासन पातळीवर संपूर्ण तयारी झालेली आहे. यात्रेच्या काळात नारळ, तेल, प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी घाटशीळ पार्किंग येथून प्रवेश दिला जाणार आहे व बाहेर पडण्यासाठी मातंगी मंदिर, जिजाऊ महाद्वारमधून सोडण्यात येणार आहे. भाविकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून तिन्ही पुजारी मंडळांकडून पुजार्‍यांची यादी मागविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत हंगामी व्यापार्‍यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान वेस या मार्गावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अतिक्रमणविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे," अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

कर्नाटक व इतर राज्यातील बसगाड्यांसाठी त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलीस व इतर कर्मचार्‍यांसाठी धर्मशाळा व शहरातील काही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात 21 ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था असणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 100 सीसीटीव्ही कॅमेरे, इतर राज्यातील भाविकांना समजण्यासाठी त्या-त्या भाषेत स्पीकर वरून माहिती सांगण्यात येईल, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.