पॅकेज म्हणा, मदत म्हणा, पण घोषणा करा! देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

'मी पॅकेज घोषित करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री', असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता

Updated: Jul 30, 2021, 04:29 PM IST
पॅकेज म्हणा, मदत म्हणा, पण घोषणा करा! देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार title=

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. 

आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा

कोल्हापूर पाहणी दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे मंत्री आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितलं आहे. अजूनही सांगली, कोल्हापूरमधलं पाणी पूर्ण ओसरायचं आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत. तात्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. 'पॅकेज म्हणा की मदत म्हणा हा त्यांचा मुद्दा आहे, फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे', असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारकडून तातडीची मदत अद्याप झालेली नाही, 2019 मध्ये तात्काळ मदत मिळाली असा उल्लेख लोक करत आहेत, तेव्हा रोखीनं तात्काळ मदत करण्यात आली होती, असं सांगतानाच नियमित कर्ज भरणाऱ्या पूरग्रस्तांना सरकार 50 हजार देणार होतं, पण ही रक्कम अजून दिलेलं नाही. सरकारने ही मदत तातडीने दिली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

तातडीच्या मदतीची गरज

दुकानदार आधी कोरोनामुळे अडचणीत होता आणि आता पूरामुळे संपूर्ण माल खराब झाला आहे, त्यांना विशेष मदत करण्याची गरज आहे,  घर-दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यांपर्यंत खराब झाले असतात. सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. 

संरक्षण भिंतीवरुन मुख्यमंत्र्यांना टोला

नदी किनारी पूर संरक्षक भिंत बांधण्याच्या मुद्द्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.