जात, धर्म, भाषा आणि लिंग यावर सदनिका नाकारणाऱ्यांची आता काही खैर नाही; उपनिबंधक कार्यालयाने घेतला मोठा निर्णय

मुलुंडमधल्या सोसायटीत मराठी महिलेला जागा नाकारल्याची बातमी झी २४ तासनं लावून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आलीय. मुलुंड उपनिबंधक कार्यालयाकडून सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिफिकेशन जारी करण्यात आल आहे. 

Updated: Oct 3, 2023, 07:08 PM IST
जात, धर्म, भाषा आणि लिंग यावर सदनिका नाकारणाऱ्यांची आता काही खैर नाही; उपनिबंधक कार्यालयाने घेतला मोठा निर्णय title=

No Room For Marathi People: मराठी भाषिक म्हणून मुंबईत तृप्ती देवरुखकर यांना व्यवसायासाठी जागा नाकारण्यात आली. मुलुंडच्या एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. या महिलेनं रडतरडत आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली यानंतर हा मुद्दा चांगलाच पेटला. मुलुंडमधल्या सोसायटीत मराठी महिलेला जागा नाकारल्याची बातमी झी २४ तासनं लावून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. जात, धर्म, भाषा आणि लिंग यावर सदनिका नाकारणाऱ्यांची आता काही खैर नाही. उपनिबंधक कार्यालयाने याबाबत मोटा निर्णय घेतला आहे. 

खासदार मनोज कोटक यांच्या पत्राची  उपनिबंधक कार्यालयाने घेतली दखल 

मुलुंड उपनिबंधक कार्यालयाकडून सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. जात ,धर्म, लिंग ,भाषा यावरून एखाद्याला सदनिका नाकारणं बेकायदेशीर असल्याचं त्यात म्हटलंय. जर असे प्रकार घडले तर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. जर एखाद्या ग्राहकास जात धर्म वंश भाषा यावरून सदनिका नाकारल्यास त्याची जबाबदारी ही व्यवस्थापकीय मंडळाची असल्याचे निर्देश दिले आहेत जर असे प्रकार आढळले तर संबंधित गृहनिर्माण संस्थेवर कार्यवाही करण्याचा इशारा देखील उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे. ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक यांनी मुलुंड मध्ये मराठी महिलेला फ्लॅट नाकारल्याच्या प्रकरणा नंतर उपनिबंधक कार्यालयाला पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सदर पत्राला प्रतिसाद देत उपनिबंधक कार्यालयाकडून सर्व गृहनिर्माण सोसायटी यांना सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. 

पंकजा मुंडेंनीही शेअर केला होता धक्कादायक अनुभव

मराठी भाषिक म्हणून मुंबईत तृप्ती देवरुखकर यांना व्यवसायासाठी जागा नाकारण्यात आली. मुलुंडच्या एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. या महिलेनं रडतरडत आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली आणि मग मनसे कार्यकर्ते मैदानात उतरले.. त्यांनी घर नाकारणा-या परप्रांतीय पिता-पुत्रांना चांगलीच अद्दल घडवली आणि त्यांच्याकडून माफी मागून घेतली. मात्र या सगळ्या प्रकारामुळे मुंबईतल्या मराठी माणसाचा मुद्दा चर्चेत आला. देवरुखकर यांच्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडेंनीही आपला धक्कादायक अनुभव शेअर केला. मराठी असल्यानं आपल्यालाही मुंबईत घर मिळत नव्हतं अशी व्यथा पंकजा मुंडेंनी मांडली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा जळजळीत इशारा 

मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे! असा खणखणीत इशाराच राज ठाकरेंनी दिला.. राज्य सरकारलाही आवाहन करायला राज ठाकरे विसरले नाहीत.