Controversial Comment On Sindhudurga Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सध्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे चर्चेत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी केसरकरांच्या, 'या दूर्घटनेमधून काहीतरी चांगले घडावे' असं विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. असे शब्द यांच्या तोंडून निघतातच कसे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीला फडणवीस आणि मोदींनी पोसलं असल्याने हे पाप त्यांचं आहे," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मंगळवारी केसरकर यांनी दुर्घटना झालेल्या स्मारकाला भेट दिली. त्यानंतर बोलताना केसरकर यांनी, "या दुर्घटनेमधून काहीतरी चांगले घडावे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर महाराजांचा भव्य पुतळा उभारला जावा," अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली. याचसंदर्भातील प्रश्न आज पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला असला त्यांनी केसरकरांना, 'सडक्या विचारांची माणसं' असं म्हणत अगदी हात जोडले.
नक्की वाचा >> शिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'
केसरकरांच्या विधानावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी, "त्यांना चपलेने मारलं पाहिजे आणि लोक मारतील. ज्या माणसाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं. त्यातून काही चांगलं घडेल. तर ही अफझलखानाची औलाद आहे, मिंध्यांनी पोसलेली!" असं म्हणत संताप व्यक्त केला. "ही अशी माणसं मिंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आम्ही तर म्हणतो बरं झालं की ही घाण आमच्याकडून गेली," असं राऊत अगदी हात जोडत म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं असं यांच्या तोंडातून निघतं तरी कसं? ही सडक्या विचारांची माणसं आहेत," अशी टीका राऊत यांनी केली.
नक्की वाचा >> बदलापूर प्रकरण: गौतमी पाटीलचा सर्व मुलींना 3 शब्दांचा सल्ला! पालकांना म्हणाली, 'आई-वडिलांनी...'
"पुतळा पडलं हे बरं झालं, हा शुभशकून आहे. यातून चांगलं घडेल असं म्हणणारी किती घाणेरड्या विचारांची लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केली आहे. हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे. हे का शिवाजी महाराजांचे इतके शत्रू झाले आहेत मला कळत नाही. हे मिंधे आणि त्यांची टोळी पोसण्याचं काम फडणवीसांनी आणि नरेंद्र मोदींनी केलं. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला. पैसे खाण्यासाठी पाडला. हा आरोप नाही सत्य आहे," असं राऊत म्हणाले.