Sanjay Raut : दिल्लीत भेटा, एके 47 ने उडवून टाकू... संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे विरोधकांवर तुटून पडले आहेत. अशातच पुन्हा एकदा संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतले आहे

Updated: Apr 1, 2023, 10:32 AM IST
Sanjay Raut : दिल्लीत भेटा, एके 47 ने उडवून टाकू... संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी title=

Sanjay Raut Death threat : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीत (Delhi) या तुमचाही मुसेवाला (sidhu moose wala) करु अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. यासोबत मेसेजमध्ये अभिनेता सलमान खान याचाही उल्लेख केला असून शिवीगाळ करण्यात आली आहे.

संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर पुण्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला होता. "हिंदू विरोधी, तुम्हाला मारून टाकू, दिल्लीत भेटा सिद्धू मुसेवालाप्रमाणे एके-47 ने मारून टाकू. लॉरेन्सकडून मेसेज आहे. सलमान आणि तुम्ही तयार राहा," असे या मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांना शिवीगाळही करण्यात आली आहे.

धमकीचा मेसेज आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. "महाराष्ट्रातील सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाच्या सुरक्षेसाठी लावल्याने कायदा आणि सुव्यवस्था ढेपाळून गेली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार अशा अनेक गोष्टी आपण पाहत आहोत. पण याच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे लक्ष नाही. आम्ही जेव्हा धमक्यांची माहिती देतो तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्ठा करतात. ठाण्यातील एका गुंड टोळीच्या म्होरक्याने मला धमकी दिलेली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नावही होते. काल रात्रीसुद्धा एका गॅंगस्टरकडून मला धमकी आली. मी याबाबत पोलिसांना कळवायचे काम केले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

"विरोधकांना आलेल्या कोणत्याही धमक्या सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. पोलीस यंत्रणा फक्त विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, खोट्या कारवाई करण्यासाठी वापरली जात आहे. असेच चालू राहू द्या आम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरे जावू. ज्या गॅंगने सलमान खानला धमकी दिली त्यांच्याच माध्यमातून मला धमकी आली आहे," असेही संजय राऊत म्हणाले.