उद्यापासून लॉकडाऊन असल्याने कल्याण-डोंबिवलीत खरेदीसाठी लोकांची गर्दी

लॉकडाऊनच्या आधी खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी

Updated: Jul 1, 2020, 03:55 PM IST
उद्यापासून लॉकडाऊन असल्याने कल्याण-डोंबिवलीत खरेदीसाठी लोकांची गर्दी title=

कल्याण : कल्याण डोंबिवली क्षेत्रात उद्यापासून दहा दिवसाचं लॉगडाऊन लागू होत असल्याने कल्याणमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केडीएमसीचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी 2 जुलै पासून 12 जुलै पर्यंत दहा दिवस संपूर्ण लॉगडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे आज सकाळपासून नागरिकांनी रस्त्यावर, मोठया प्रमाणात गर्दी केली होती. 

किराणा दुकानाच्या बाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी ऑड-इवननुसार दुकानं बंद असताना देखील दुकानं उघडून विक्री करत होते. भाजी, फळे विकणाऱ्या लोट गाड्यांजवळ देखील मोठी गर्दी दिसून येत होती. कल्याण डोंबिवलीकर देखील कोरोनाच्या या काळात गंभीर नसल्याचं दिसून येतंय. 

अनलॉक पासून कल्याण डोंबिवली क्षेत्रात नागरिक मोठया प्रमाणात बाहेर पडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या महिना भरात तब्बल पाच हजार रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी उद्या पासून संपूर्ण लॉगडाऊन करण्यात येणार आहे.