मुंबई/ सिंधुदुर्ग : भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी राज्य प्रभारी सरोजिनी पांडे यांच्याकडे केली आहे. जठार यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्यासाठी बोलावलं आहे. राण्यांसोबत वाद नको अशी समज जठार यांना दिली जाणार आहे. राणे हे भाजपच्या ए बी फॉर्मवर खासदार झाले असून ते सातत्याने भाजपवरच टीका करत आहेत त्यामुळे भाजपचे नुकसान होत आहे अशी टीका जठार यांनी केलीय.
राणे हे भाजपमुळे खासदार झाले आहेत, ते हे विसरले आहेत. तरीही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करतात. 'अच्छे दिन'च्या घोषणेची टिंगलटवाळी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ते टीका करतात. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली. पनवेलमध्ये झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीत सरोजिनी पांडे यांच्याकडे आपण तशी मागणी केली आहे, अशी माहिती प्रमोद जठार यांनीच 'झी २४ तास'ला दिली.
राणेंबाबत जठार यांनी अशी भूमिका घेतल्याने आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे पडसाद उमटू शकतात. राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अधिक वाद वाढविण्याबाबत भाजप श्रेष्ठी तयार नाहीत. तीन राज्यांत झालेल्या पराभवानंतर भाजपने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे जठार यांना मुख्यमंत्री समज देणार असल्याचे वृत्त आहे.