Farming News : हा शंख नव्हे, ही तर अळी; पिकांवर होणारे परिणाम जाणून बसेल धक्का

राज्यातील 'या' भागांमध्ये आढळला हा प्रकार....   

Updated: Jul 2, 2021, 12:22 PM IST
Farming News : हा शंख नव्हे, ही तर अळी; पिकांवर होणारे परिणाम जाणून बसेल धक्का  title=
हा शंख नव्हे, ही तर अळी

अनिरुद्ध दवाळे, अमरावती : पर्यावरणातील प्रत्येक घटक हा अनेकदा आपल्याला थक्क करुन जातो. सध्या निसर्गातील असाच एक घटक सर्वांचं लक्ष वेधत आहे. अर्थात या घटकाचा पिकांवर परिणामही होत आहे. पण, त्याचा आकार पाहता प्रथमदर्शनी सर्वांचंच लक्ष वेधलं जात आहे. हा प्रकार म्हणजे शंखु अळीचा. 

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात शेती कसणे म्हणजे जिकरीचं काम. कारण हा संपूर्ण भाग पहाडी भाग आहे. त्यात अनेकदा पाऊस जास्त होतो त्यामुळे हमखास उत्पन्नाची हमी देखील नाही त्यामुळे येथील शेतकरी नेहमी विविध संकटात सापडत असतो. पेरणीला अवघे काही दिवस झाले असतानाच येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे आणि ते संकट आहे.

पिकांवर पडलेल्या 'केसाळ' अळीचा मोठा प्रादुर्भाव असल्याने वर आलेल्या पिकांचे पाने ही अळी कुरतडत आहे. दरम्यान या अळीचा सर्वाधिक प्रभाव हा चिखलदरा तालुक्यातील जंगल परिसरातील गावांमध्ये दिसून आला. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून शेतात बियाण्याची पेरणी केली त्या शेतात मात्र या अळीचा प्रादुर्भाव नसल्याचा जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मेळघाटातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतात पेरणी केली. मेळघाटामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मका पिकाची लागवड करतात. सध्या मक्याचे पीक हे चांगले तग धरत आहे. परंतु अशातच चिखलदारा तालुक्‍यातील जंगल भागातील जवळपास अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या केसाळ अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आल्याने पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील शेतकरी संकटात सापडला आहे.

चांदुर बाजार तालुक्यात शंखुअळीचा प्रादुर्भाव....

गेल्या वर्षी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात  आलेल्या शंखु अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला होता. यंदाही चांदुर बाजार तालुक्यात शंखु अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

अचलपूर तालुक्यात नागवाणी अळीचा प्रादुर्भाव

मेळघाटात केसाळ अळीने कहर केल्यानंतर आता मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर तालुक्यात नागवाणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता या अळीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले जात आहे. सध्या पावसाने गेल्या आठ दिवासनांपासून दांडी मारल्याने नागवाणी अळीला खाण्यासाठी जे खाद्य लागले ते उपलब्ध होत नसल्याने ही अळी पिकांवर आक्रमक करत असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Image preview

जिल्ह्यातील सोयाबिनवर खोड माशीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता

जिल्ह्यात गेल्या वर्षी सोयाबिनवर आलेल्या खोड माशीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उभे असलेले पीक कापून टाकण्याची अनेक शेतकऱ्यांवर वेळ आली होती. मात्र आता पिकांची योग्य काळजी न घेतल्यास पुन्हा या वर्षी सोयाबिनवर खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आधीच पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात असताना आणखी एक नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकण्याची वेळ आली आहे.