आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होतंय. कोरोना पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी प्रस्थान सोहळा मर्यादित म्हणजेच 100 वारकऱ्यांच्या उपस्थितीत होतोय. प्रस्थानानंतर दर्शनासाठी 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आलीये.
ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात प्रस्थानाचा उत्साह असला तरी इंद्रायणी घाट मात्र सुना सुना आहे...! तुरळक पोलिस आणि काही स्थानिक अशा बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींचा वावर घाटावर पाहायला मिळत आहे.
पण याच घाटावर एक अनोख दृश्य पाहायला मिळाले. कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याला एक चिमुकला वारकरी दिसला. आणि या महिला कर्मचाऱ्याला त्या घाटावर त्याला मिठीत मारण्याचा मोह आवरता आला नाही.
ही दृश्य वारी परंपरेचे अनोखे चित्र दाखवणारे आहे, अशीच भावना पाहणाऱ्यांच्या मनात आली. हा फोटो आता वेगाने व्हायरल होऊ लागला आहे.
तर दुसरीकडे मात्र आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्याला कोरोनाचं ग्रहण लागलंय. प्रस्थान सोहळ्यातल्या 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झालीये.