Nashik Crime: Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले... नाशिकमधल्या घटनेने खळबळ

विम्याचे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी अगदी पद्धतशीर प्लान आखण्यात आला,  विम्याचे पैसेही खात्यात जमा झाले... दीड वर्षांनी असा झाला पर्दाफश  

Updated: Dec 15, 2022, 11:15 AM IST
Nashik Crime: Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले... नाशिकमधल्या घटनेने खळबळ title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : विम्याचे (Insurance) कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी एक टोळीने अगदी पद्धतीशीर प्लान रचला. त्यांचा प्लान यशस्वी झाला आणि त्यांना विम्याचे तब्बल 4 कोटी रुपये मिळाले देखील. पण म्हणतात सत्य फार काळ लपून रहात नाही. अखेर दीड वर्षांनी त्यांच्या प्लानचा पर्दाफाश झाला आणि चार जणांना अटक करण्यात आली. पण या प्रकरणामुळे विमा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये (Nashik) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

विमा क्षेत्रातील मोठी फसवणूक
नाशिकमध्ये घडलेल्या विमा क्षेत्रातल्या (insurance sector) सर्वात मोठ्या फसवणूकीचा मास्टरमाईंड (Mastermind) आहे मंगेश बाबूराव सावकार. अगदी नियोजनबद्ध रितीने त्याने प्लान तयार केला होता. मंगेश सावकार याने आपल्या ओळखीतल्या अशोक रमेश भालेराव यांच्या नावावर विमा कंपन्यांकडून 10 वेगवेगळ्या पॉलिसी काढल्या होत्या. या पॉलिसींच्या नॉमिनी अशोक भालेराव यांची पत्नी होती. 2019 पासून या पॉलिसी सुरु करण्यात आल्या. या पॉलिसीचे नियमित हप्तेही भरले जात होते.

असा होता प्लान
अशोक भालेरावचा मृत्यू झाल्याचं दाखवत त्याच्या पॉलिसीचे (Insurance Policy) पैसे लाटायचे असा मंगेश सावकारचा प्लान होता. यात स्वत: अशोक भालेरावही सहभागी होता. यासाठी त्यांनी अनोळखी व्यक्तीचा खून करण्याचं ठरवलं. पण शोधूनही तशी व्यक्ती सापडत नसल्याने मंगेश सावकारने आणखी तीन जणांबरोबर मिळून अशोक भालेरावचाच काटा काढला. अशोक भालेरावची हत्या करुन तो मोटरसायकल अपघात असल्याचं भासवण्यात आलं. नाशिकमधल्या इंदिरानर जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला रस्त्यावर अशोक भालेरावचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अपघाताची नोंद करत प्रकरणाची व्हिलेवाट लावली.

हे ही वाचा : यांना आवरा! पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावर उभं राहून गोळीबार, Video व्हायरल

चार कोटी आपापसात वाटून घेतले
अशोक भालेरावच्या अपघाती मृत्यूची नोंद घेत विमा कंपन्यांनी त्याच्या पत्नीच्या अकाऊंटला तब्बल 4 कोटी 10 लाख रुपये ट्रान्सफर केले. हे सर्व पैसे मंगेश सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना आपापसात वाटून घेतले. 

असा झाला प्रकरणाचा पर्दाफाश
अशोक भालेराव यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाचा नव्याने तपास सुरु झाला. अखेर तपासात संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी मंगेश सावकार याच्या मोटारसायकलच्या डिकित पोलिसांना पिस्तूल आणि 6 जिवंत काडतूसही आढळून आली. याच पद्धतीने आणखी काही प्रकरणात आरोपींनी विम्याची रक्कम हडपल्याचा पोलिसांना संशय आहे.