किरण ताजणे, झी 24 तास, पुणे : लग्न करायला गेलेल्या जोडप्याला लव्ह जिहाद म्हणून धमक्या येत असल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील उच्चशिक्षित एक जोडपं प्रेम विवाह करण्यासाठी न्यायालयात गेलं होतं. त्याठिकाणी नोटीस लावली होती तीच नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांना लव्ह जिहाद म्हणून धमक्या दिल्याचं बोललं जाऊ लागलं.
सोशल मीडियावर हीच नोटीस शेअर करत हिंदू संघटनांनी लग्न करू नये असं आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या दोघांच्याही घरच्यांची परवानगी आहे. त्यातच ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी लग्न होऊ नये याकरिता विनंती करत माघील इतिहास बघूनच लग्न करा. ९० टक्के लव्ह जिहादचे विवाह टिकले नाही असा दावा ही केलाय.
विवाह करण्यासाठी गेलेल्या तरुण- तरुणीला सोशल मीडियावरील धमक्यांना सामोरे जावं लागतंय. धर्माच्या पलीकडे जाऊन विवाहबध्द होण्याचं ठरविलं होत त्यानुसार विवाह न्यायालयात लग्नासाठी लावलेली नोटीस लावली होती. हीच नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं या दोन्हीना भीतीच्या छायेखाली राहावं लागतंय. दोन्ही ही उच्चशिक्षित असून मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू आहेत.
विशेष म्हणजे घरच्यांच्या परवानगीने लग्न केले जात असतांना हा धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलाय. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनाकडून हिंदू संघटनाच्या मोहिमेला विरोध केला जातोय. कायद्यानुसार अधिकार असतांना अश्या विनंतीच्या नावाखाली धमक्या दिल्या जाताय असं ही मत मुस्लिम संघटनाच मत आहे.
सोशल मीडियावर या नोटीस ला व्हायरल करत मुलीच्या घरी कळवा, लव्ह जिहाद थांबवा अशी मोहीमच काहींनी सुरू केलीय. त्यामुळे हा सगळा प्रकार गंभीर असून संबंधित यंत्रणेने याची दखल घेणे गरजेचे आहे.