ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

दिवा भागात पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे.

Updated: Apr 11, 2020, 08:24 PM IST
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ title=
संग्रहित फोटो

ठाणे : मुंबईसह ठाणे महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवारी 3 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी दिवा भागात पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या 41वर पोहचली आहे.

तर दुसरीकडे उल्हासनगरमध्येही एका नवा कोरोनाबाधित आढळला आहे. उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठाणे शहरात राहणारा आहे. उल्हासनगरच्या शिवनेरी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. उल्हासनगर पालिका प्रशासनाने रुग्णालय सील केलं आहे. तर शिवनेरी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन  करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंब्र्यातही आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंब्र्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तीनवर पोहचला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कळवा हा ठाणे पालिकेतील हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे संपूर्ण शटडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळव्यात कोरोना रुग्णांची संख्या 10वर पोहचली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूरमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. अंबरनाथमध्ये दोन तर बदलापूरमध्ये तीन कोरोनाग्रस्त आढळले आहेत. बदलापूरमधील दोन कोरोनाबाधित कात्रप भागातील तर एक जण हेंद्रेपाडा भागात राहणारा आहे. बदलापूरमध्ये कोरोनाचे पहिलेच तीन रुग्ण आढळल्यानंतर आता तेथील परिसर नगरपालिकेकडून सील करण्यात आला आहे.

कल्याण- डोंबिवलीतही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४३वर गेली आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1761वर पोहचली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 1182 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० टक्के रुग्ण धोक्याबाहेर आहेत. तर ५ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरमध्ये ९१ टक्के रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत ६१ टक्के कोरोनाबाधित आहेत.