मुंबई / रत्नागिरी : जिल्ह्यात बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मुंबई आणि उपनगरातून जिल्ह्यात आलेल्या लोकांमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. तर आज आणखी पाच रुग्ण वाढल्याने आता कोरोना बाधितांची संख्या ५२वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. ऑरेंज झोनमधून जिल्हा आता रेड झोनकडे वाटचाल करत असल्याने येथे निर्बंध कडक होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा प्रशासनाबरोबरच नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
BreakingNews । रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण वाढले । आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १६ पैकी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह । जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीने पार केलं अर्धशतक । कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ वर #Coronavirus #COVID19@ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 12, 2020
जिल्ह्यात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण वाढले आहेत. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १६ पैकी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीने अर्धशतक पार केले आहे. दरम्यान, गुहागर तालुक्यातील जामसुदमधील त्या कोरोना संक्रमित ६५ वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला होता. त्याचा आज आलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. व्यक्तीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी हा रिपोर्ट आला. आता बळींचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
दरम्यान, कोकण सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. पहिला रुग्ण हा दुबईतून गुहागरमधील शृंगारतळी येथे आला होता. तो पूर्णपणे बरा झाला होता. त्यानंतर काही रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले होते. तसेच त्यानंतर जिल्हयात एकही बाधित रुग्ण नव्हता. मात्र, अचानक रुग्ण संख्येत वाढ झाली होती. मात्र, त्यावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाला यश येत होते. मात्र, मुंबई आणि उपनगरातून आलेल्या काही लोकांमुळे पुन्हा कोरोनाने जिल्ह्यात डोके पुन्हा वर काढले आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात अनेक लोक दाखल होत आहेत, काही पास घेऊन येत आहेत तर काही विना पासाचे दाखल होत आहेत. काही लपून झपून मार्गाने येत आहेत. तसेच नवी माहिती उघड झाली आहे ती म्हणजे, मुंबईतून दिले जाणारे पास रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला विचारुन दिले जात नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. येथील यंत्रण कशी आहे. काय परिस्थिती आहे? किती क्षमता आहे ? याचा विचार न करता लोकांना पासेस दिले जात असतील तर आमच्या समोरच्या अडचणी वाढणारच आहेत, किंबहुना त्या वाढल्या आहेत, असा सूर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी व्यक्त केला. त्यामुळे नवे रुग्ण वाढत असल्याने चिंतेत अधिक भर पडत आहे.