मुंबई : गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने अद्यापही आपली पाठ सोडलेली नाही. एवढंच नाही तर आता डेल्टा प्लस व्हेरिएन्टची दहशत अधिक वाढताना दिसत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएन्ट संक्रमित 30 रूग्ण आढळले आहेत. सध्या रूग्णांचे नमूणे जीनोम सीक्वेंसिंगसाठी पुण्यात पाठवले आहेत. दरम्यान डेल्टा व्हेरिएन्टचे रूग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याची सर्वांचीचं जबाबदारी आहे.
एएनआयने नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर किशोर श्रीनिवास यांच्यासोबत संवाद साधला. तेव्हा डॉक्टर म्हणाले, 'नाशिकमध्ये डेल्टा संक्रमित 30 रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 28 रूग्ण ग्रामीण भागातले आहेत. डेल्टा व्हेरिएन्टबद्दल माहिती मिळाल्यानंतर नमुने जीनोम सीक्वेसिंगसाठी नमुने पुणे पाठवण्यात आले आहेत.' डेल्टा व्हेरिएन्टचावाढता संसर्ग लक्षात घेत कोरोना नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात 4 ऑगस्टपर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे 83 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामधील 33 रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लसचे 11 तर तामिळनाडूमध्ये 10 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएन्टमुळे चेतावणी जारी केली आहे.
शाळा होणार सुरू
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या भागात सध्या ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू आहेत त्या जिल्ह्यांमध्ये 5 ते 8 चे वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. तर शहरांमध्ये 8 ते 12 वीचे वर्ष सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू होणार आहे.