एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत १ वर्षाची वाढ

लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Updated: Apr 16, 2020, 11:09 PM IST
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत १ वर्षाची वाढ title=

मुंबई : लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी यंदाचं वर्ष ही शेवटची संधी होती. वयाची मर्यादा याच वर्षी संपत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आशा मावळल्या होत्या. पण अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. 

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून लाखो उमेदवार एमपीएससीची परीक्षा देतात. यावर्षी कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा या वर्षी संपत होती अशा उमेदवारांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना १ वर्ष वाढवून दिलं जाईल, असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. युपीएससीच्या विद्यार्थ्यांनाही अशीच सवलत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अनेकांच्या करियरला कोरोनाची बाधा झाल्यासारखं झालं होतं. पण सरकारने या उमेदवारांना दिलासा देणारं आश्वासन दिलं आहे, त्यामुळे हजारो उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे.