मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा विळखा आता महाराष्ट्र प्रशासन आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वाढवू लागला आहे. सध्याच्या घडीला देशभरात कोरोनाबाधिकांचा आकडा महाराष्ट्रात वाढतच असल्याची बाब समोर आली आहे. आताच्या घडीपर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांच्या पार गेली आहे.
गुरुवारी आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार हा आकडा ३२०२ वर पोहोचला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात एकूण २८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर, याच दिवशी ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या या वाढत्या आकड्यांमध्ये मायानगरी मुंबईतही परिस्थिती चिंतातूर असल्याची पाहायला मिळाली.
गुरुवारी शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा २०७३ वर पोहोचला. ज्यामध्ये तिघांचा मृत्यूही झाला. तर, या दिवशी मृत पावलेले 4 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. नव्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ७१,०७६ जण हे होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, ६१०८ जण हे संस्थात्मक क्वारंटाईन असल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्याचा मृत्यूदर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे. ज्या पार्श्वभूमीवर मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी, जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करण्यासाठी राज्य स्तरावर डॉक्टरांचं टास्क फोर्स स्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राज्यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठीएक हॉटलाईन सुरु होणार आहे.